लोटस (लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टीचिंग अंडरप्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स)उद्दिष्ट

वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्रदान करणे.


का व कसे

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती शिक्षणात आहे. शिक्षण ही जीवनाची तरतूद नव्हे तर शिक्षण हे जीवनच आहे. स्वप्न पाहण्याचा आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचा हा एक मार्ग आहे. तथापि, शाळेत दाखल होणार्‍या सर्व मुलांस उच्च शिक्षणाची संधी मिळतेच असे नाही. बहुतांश वेळा आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपली शिक्षणाची भूक मारणे भाग पडते.

लोकमंगल फाऊंडेशनने उच्च शिक्षणाची गरज नेहेमीच ओळखली आहे. याच प्रेरणेतून आम्ही विद्यादान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेस LOTUS (लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टिचिंग अंडरप्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स) म्हणूनही ओळखले जाते. येथे गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येते व त्यांचे शैक्षणिक खर्च फाऊंडेशनद्वारे पूर्ण केले जातात.

या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत दरवर्षी एचएससी पास झालेल्या २०० विद्यार्थ्यांना लोकमंगल फाऊंडेशनकडून पाठबळ दिले जाते. त्यांच्या शैक्षणिक खर्चास आधार देऊन त्यांच्या भविष्यासाठी योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याप्रकारे त्यांची मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही लहानशी मदत करतो. कारण, स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.

या मुलांना दत्तक घेऊन आपणही ही जबाबदारी वाटून घेऊ शकता. आपल्या पुढच्या पिढीसाठी उत्तम भविष्य निर्माण करू इच्छिणाऱ्यांना आम्ही मदत करतो. शिक्षणाची तीव्र इच्छा असणारी वंचित मुले आणि त्यांच्यासाठी काही करू इच्छिणार्‍या दानशूर व्यक्ती या दोघांमधील दुवा म्हणून आम्ही कार्यरत आहोत.

देणगीदार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये निधी हस्तांतरणासाठी एक सामाईक माध्यम म्हणून आम्ही काम करतो. दात्यांना त्यांच्या निधीच्या सहाय्याने मदत केलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील प्राप्त होतो जेणेकरून ते त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेताना त्यांच्या संपर्कातही राहू शकतील. विश्वास, पारदर्शकता आणि जबाबदारी यांच्या पायावर LOTUS उभी आहे.

"शिक्षणामुळे आत्मविश्वास आणि आत्मविश्वासामुळे उमेद जन्म घेते" अशी एक सुंदर म्हण आहे. शिक्षणाची आस असणार्‍या व ते मिळविण्यासाठी झटणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला आत्मविश्वास जागृत करावयाचा आहे.

आपणही एक आधारस्तंभ बना.