सामुदायिक विवाह सोहळाउद्दिष्टे

  • आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्यास मदत करण्यासाठी
  • हुंड्या सारख्या वाईट सामाजिक प्रथांचा अंत करण्यासाठी
  • कुटुंबाने विवाहासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचा जास्त सयुक्तिक कारणासाठी उपयोग करता यावा यासाठी
  • संपूर्ण समाजाला जात, पंथ यांपलीकडे जाऊन एकत्र आणणे तसेच सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी

का आणि कसे

आयुष्याच्या प्रवासात विवाह हा एक प्रमुख व महत्वाचा टप्पा असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणजे अशी व्यक्ती, ज्यांच्यासोबत आपण आपल्या सुख दुःखाची देवाणघेवाण करू शकतो. विवाह म्हणजे त्या व्यक्तीसोबत जोडलेले जन्मभराचे नाते.

तथापि, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लग्नगाठ बांधणे हे वाटते तेवढे सोपे नसते. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा विवाह सोहळा थाटात करताना लहान सहान गोष्टींसाठी होणारे खर्चही त्यांच्यासाठी आवाक्याबाहेरचे ठरतात.

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशनने सामुदायिक विवाह सोहळा (Community Wedding Event) सुरू केला आहे, ज्यामध्ये विवाहेच्छू वधू वरांना विवाहासाठी विविध सुविधा मोफत पुरविल्या जातात.

सामुदायिक विवाह सोहळा हा खरोखर एक भव्य वार्षिक कार्यक्रम आहे, जेथे विविध जाती आणि समुदायातील हजारो जोडप्यांना विवाहाच्या निमित्ताने एकत्र आणले जाते. अतिशय नेटकेपणाने आयोजित केलेला हा सोहळा भव्य मांडवाखाली संपन्न होतो. या सोहळ्यासाठी सुंदर सजविलेल्या स्टेजसह प्रकाश व्यवस्था, पीए प्रणाली, संगीत अशा अन्य व्यवस्थाही केल्या जातात.

या सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना विवाहाचा पोशाख, दागदागिने आणि गृहोपयोगी वस्तू दिल्या जातात ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर होईल. याव्यतिरिक्त, एका दिवसात एक लाख अतिथींना भोजन देण्यासाठी प्रचंड प्रमाणावर खानपान सुविधाही तयार केली गेली आहे! लग्नाचे विधी त्या त्या समाजाच्या प्रथांनुसार केले जातात, त्यासाठीसर्व प्रमुख समाजातील गुरुजींना लग्नासाठी आमंत्रित केले जाते.

वधू मागासवर्गीय असल्यास फाऊंडेशन सामाजिक कल्याण विभागातर्फे त्यांना 'कन्यादान अनुदान' मिळवून देण्यास मदत करते.

फाऊंडेशनतर्फे मिळणारा आर्थिक आधार ही या प्रकल्पातील एकमेव प्रशंसनीय बाब नव्हे, तर समाजात असणार्‍या हुंड्यासारख्या दुष्प्रथांचा निःपात करण्याचाही हा एक मोठा मार्ग आहे, ही अजून एक स्वागतार्ह बाब आहे.

२००७ पासून लोकमंगल फाऊंडेशनने सुरुवात केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याद्वारे ३००० पेक्षा अधिक जोडप्यांना लग्नगाठ बांधण्यास सहाय्य केले आहे. निराधार कुटुंबांना व भावी वधूंना त्यांचे मानाने विवाह करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. गरिबांची सेवा करण्याचे हे व्रत आम्ही घेतले आहे व आम्ही यापुढेही ते असेच अविरत सुरू ठेवू.

आपणही एक आधारस्तंभ बना.